सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये सोमवारी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी त्यांनी 'ममता चोर' लिहिलेला टी-शर्ट घातला होता. यावर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने शुभेंदू अधिकारी आणि इतर भाजप नेत्यांविरुद्ध कोलकाता येथील दोन पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत.
भाजप नेत्यांनी निदर्शनादरम्यान 'ममता चोर' लिहिलेले टी-शर्ट घातले होता. याप्रकरणी राज्याचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी मैदान आणि हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. निदर्शनादरम्यान असे कृत्य करणे म्हणजे राज्याचे कार्यकारी प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांचा घोर अपमान आहे, असे दावा चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी २८ नोव्हेंबरला विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना विधानसभेच्या संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार तापस रॉय यांनी शुभेंदू अधिकारी यांना विधानसभेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.
यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनी सोमवारी विधानसभा संकुलाजवळील रेड रोडवर निदर्शने केली. यावेळी सर्व आमदारांनी 'ममता चोर' लिहिलेले टी-शर्ट घातले होते. दरम्यान, यापूर्वी २८ मार्च २०२२ रोजी शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्या अधिवेशनापूर्वी भाजपच्या दोन आमदारांना निलंबित करण्यात आले होते. भाजपच्या एकूण सात आमदारांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले.