पाटणा - देशात शनिवारी 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर कोरोनाचं सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने देशभरात आणि विदेशात असलेल्या नागरिकांनी परदेशात तिरंगा फडकवला. नेटीझन्सनेही सोशल मीडियातून देशभक्ती व देशप्रेमाच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, दुर्गम भागातील नागरिकांची तीव्र इच्छाशक्ती पाहून, लाख असतील अडचणी तरीही आम्ही तत्पर सदैव तिरंग्यासाठी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बिहारमधील पूर दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांनी असाच स्वातंत्र्य दिन साजरा करुन देशभक्तीचं उदाहरण दिलंय.
भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. बिहारमध्ये सध्या कोरोना महामारीसोबत पावसाळ्यातील पुराचे संकट आहे. विशेषत: दरभंगा येथील परिस्थिती अतिशय हालाखीची बनली आहे. मात्र, तरीही येथील अंगणवाडीसेविकांनी देशभक्तीचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय. या महिलांच्या खांद्यापर्यंत आलंय पुराचं पाणी, फिर भी दिल है हिंदुस्तानी... हेच त्यांनी दाखवून दिलंय.
या अंगणवाडी सेविकांच्या खांद्यापर्यंत पावसामुळे पुराचे पाणी आलंय. त्यांची शाळाही पावसाच्या पाण्यातच तरलेली दिसतेय. मात्र, या परिस्थितही या महिलांनी तिरंग्याला सलामी दिली. तर, येथील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी नावेत (बोट) उभारून ध्वजारोहन केलं. संकटाच्या काळातील या ध्वजारोहनावेळी वंदे मातरमच्या घोषणाही देण्यात आल्या. या नागरिकांच्या देशभक्तीने देशासाठी कायपण... हेच दाखवून दिलंय.
दरभंगा जिल्ह्यातील बिरौल मंडल मुख्यालयात अंगणवाडीसेविकांनी पुराच्या पाण्यात उतरुन ध्वजारोहन केले. ज्यांनी या महिलांचा ध्वजारोहन समारंभ पाहिला, प्रत्येकाने तिरंग्यासोबत या महिलांच्या देशभक्तीलाही सॅल्यूट केला. सोशल मीडियावरही या महिलांनी तिरंग्याला दिलेल्या सलामीचे फोटो व्हायरल झाले आहेत.