बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल बुधवारी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमित मालवीय यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153ए, 120बी, 505(2), 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. यासंबंधीची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी 19 जून रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि भाजपच्या चंदिगड युनिटचे अध्यक्ष अरुण सूद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
प्रियांक खरगे म्हणाले की, " भाजपला देशाचा कायदा, राज्यघटना पाळण्यात अडचण आहे आणि आपण तो कायदा पाळला तर त्यांना आणखी अडचण आहे. एएफआयआरचा कोणता भाग दुर्भावनापूर्ण हेतूने नोंदवला गेला आहे, हे भाजपने सांगावे. त्या व्हिडिओचा निर्माता आणि खोटे पसरवणारी व्यक्ती कोण आहे? एफआयआर नोंदवण्यासाठी एक आठवडा लागला आहे. जर त्यांना समस्या असल्यास त्यांनी न्यायालयात जावे."
दुसरीकडे, काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही अमित मालवीय यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "त्याच्या (अमित मालवीय) विरोधात आणखी एफआयआर नोंदवायला हव्यात. सत्य, तथ्य, लोकांच्या प्रतिमा आणि देशाच्या प्रतिष्ठेशी खेळण्यास कोणी जबाबदार असेल तर ते भाजप आयटी सेल आहे. मला आश्चर्य वाटते की, सरकारने त्यांच्याविरुद्ध अद्याप एफआयआर का नोंदवला नाही?"