बंगळुरू : कर्नाटकचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात पोलिसांनी शनिवारी माहिती दिली. काँग्रेसचे नगराध्यक्ष परशुराम होसमनी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
परशुराम होसमनी यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, १५ ऑक्टोबर रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात विजयपुरा येथील भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. दरम्यान, जानूणबूजुन अपमान करणे, शांतता भंग करणे आणि खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवणे, या प्रकरणी बसनगौडा पाटील यत्नल यांच्याविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी काँग्रेस नेत्यावर अपमानास्पद वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत. नुकताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपमधील एका मोठ्या नेत्याने १००० कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत, असे ते म्हणाले होते. मात्र, बसनगौडा पाटील यत्नल यांनी त्या नेत्याचे नाव उघड केले नाही. दरम्यान, याप्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एस मनोहर यांनी भाजप आमदाराविरोधात तक्रार दाखल केली होती.