अहमदाबाद : देशात कोरोना व्हायरचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. यातच गुजरातमधीलस्टॅच्यू ऑफ युनिटी विकण्यासंबंधी ऑनलाइन जाहिरात देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
ऑनलाइन वेबसाइट ओएलक्सवर जगातील सर्वात उंच प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्याची जाहिरात देण्यात आली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ओएलएक्सवर ही जाहिरात पोस्ट केली आहे. ज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. तसेच, या जाहिरातीत स्टॅच्यू ऑफ युनिटी ३० हजार कोटी रुपयांना विकली जाणार असल्याचे म्हटले आहे.
सोबतच असे लिहिले आहे की, गुजरात सरकारला कोरोना व्हायरच्या संकटावर मात करण्यासाठी हॉस्पिटल आणि मेडिकल उपकरणांसाठी पैशांची गरज आहे. याप्रकरणी उप-जिल्हाधिकारी निलेश दुबे यांनी सांगितले की, ओएलएक्स कंपनीसोबत बातचीत झाल्यानंतर ही जाहिरात हटविण्यात आली आहे. दरम्यान, कोणी अशाप्रकारची जाहिरात वेबसाइटवर दिली होती, याचा शोध सुरु आहे.
दरम्यान, स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक आहे. जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण झाले. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन एन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.
स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.