गुजरात : भारतात होणाऱ्या किक्रेट वर्ल्डकपवर (World Cup 2023) खलिस्तानी दहशतवादाचे (Khalistani Attack) सावट आहे. दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूने (Gurpatwant Singh Pannu) वर्ल्डकप सामन्यावर हल्ल्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अहमदाबाद सायबर क्राइमचे डीसीपी अजित रंजन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "विविध सोशल मीडिया हँडलवर पूर्व-रेकॉर्ड केलेले धमकीचे मेसेज जारी करण्यात आले आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुरपतवंत सिंग पन्नूविरोधात 121 (ए), 121 (ए)(बी), 505 आयपीसी, यूएपीए आणि आयटी अॅक्ट 66 एफ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळ तीव्र होताना दिसत आहे. तसेच, खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने निज्जरच्या हत्येचा बदला म्हणून वर्ल्डकपच्या सामन्याला लक्ष्य करण्याची धमकी दिली. यादरम्यान, गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडीओ समोर आला. यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आरोप केले. तसेच, अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यावर खलिस्तानी हल्ला करण्याचा इशारा सुद्धा दिला होता.
पन्नूविरोधात अनेक राज्यांमध्ये 16 गुन्हे दाखलशीख फॉर जस्टिस या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख असलेल्या पन्नूला गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले होते. एका नवीन गुप्तचर अहवालात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू त्याच्या अजेंड्याबद्दल सांगत आहे. सुरक्षा यंत्रणांनी नुकतेच एक नवे दस्तावेज तयार केले आहेत. यामध्ये पन्नूच्या कारवाया आणि धर्माच्या आधारे देशाची फाळणी करण्याच्या तिच्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे.