ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील बीरवाह भागामध्ये जमावाच्या दगडफेकीपासून स्वत:च्या बचावासाठी एका स्थानिक तरुणाला जीपला बांधल्याच्या प्रकरणात सैन्याच्या अज्ञात जवानांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीच्या दरम्यान जवानांना स्थानिक तरूण लाथा-बुक्क्यांनी मारहण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्या घटनेनंतर जमावाच्या दगडफेकीपासून स्वत:च्या बचावासाठी लष्कराने तरुणाला जीपला बांधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीरवाह पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भादंविच्या कलम 342 (चुकीच्या पद्धतीने एखाद्याला कारावासात ठेवणे), 149 (गुन्ह्यासाठी बेकायदेशीरपणे एकत्र येणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 367 (अपहरण करणे) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. 14 एप्रिल रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बडगाम जिल्ह्यातील फारुक अहमद डार या व्यक्तीला जीपवर बसविण्यात आले होते.
केंद्राकडून समर्थन-केंद्र सरकारने मात्र तरुणाला जीपला बांधण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. दगडफेक करणाऱ्या जमावाने जवानांच्या वाहनाने वेढल्याने स्वसंरक्षणासाठी कमांडिग आॅफिसरला नाखुशीने तो निर्णय घ्यावा लागला, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्राच्या नेमकी उलट भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन-पाकिस्तानच्या सैन्याने या महिन्यात सहाव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ त्यांनी गोळीबार केला. संरक्षण विभागाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यात नौशेरा भागात नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याच्या चौक्यांवर सोमवारी सकाळी आठ वाजता अंदाधुंद गोळीबार केला. दीर्घकाळ ही चकमक सुरु होती.