सागर - मध्य प्रदेशातील सागर येथील एका न्यायालयानं नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची परवानगी दिली आहे. हे कथित प्रकरण पाच वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
राजेंद्र मिश्र नावाच्या व्यक्तीनं न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. लोकसभा 2014 च्या निवडणुकीदरम्यान केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक चिन्ह 'झाडू' आपल्या तिरंग्यास फडकावला, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
झाडूसहीत राष्ट्रध्वज फडकावणे हा तिरंग्याचा अपमान आहे, असा आरोप करत याचिकाकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयानं याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अरविंद केजरीवाल आणि आप कार्यकर्त्यांविरोधात आता सागर, बीना, खुरई आणि नवी दिल्लीमध्ये याप्रकरणी खटले दाखल करण्यात येतील.