चंदीगड : जाट समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या भाजपाच्या घोषणेनंतर जाट आंदोलकांनी रेल्वे मार्ग व रस्त्यांवर निर्माण केलेले अडथळे हटविण्याला सुरुवात केली आहे आणि संचारबंदीही टप्प्याटप्प्यात उठविण्यात येत असल्याने हरियाणातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. तथापि सोनीपतमध्ये सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले आहेत. अन्य काही भागांतही मात्र जाळपोळीच्या तुरळक घटना घडल्याचे वृत्त आहे. हे आंदोलन संपल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे सरकारने या आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटंबीयांना १0 लाख रुपयांची मदत आणि घरातील एका व्यक्तीला राज्य सरकारमध्ये नोकरी देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. मात्र आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि भाजपचे खा. राजकुमार सैनी यांच्यावर विद्वेषाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जाट नेत्यांनी केली आहे. हरियाणामधून दिल्लीला होणारा पाणी पुरवठा जाट आंदोलनामुळे खंडित झाला होता, सुरक्षा दलांनी मुनाक कालव्यावर पुन्हा ताबा मिळविल्यामुळे तो सुरू झााला असला तरी मंगळवारी सकाळपर्यंत तो पूर्ववत होईल. मात्र काही भागांतून अद्याप हिंसक घटनांच्या बातम्या येत असून, रोहतकच्या मेहाम येथे आंदोलकांनी एका सरकारी वाहनाला आग लावली आणि रास्ता रोको केले. दिल्ली-अंबाला महामार्गासह भिवानी, रोहतक व हिसारमधील काही मार्ग अद्यापही बंदच आहेत. रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात सोमवारी जाट आंदोलकांनी एक मॉल व अन्य अनेक दुकानांची तोडफोड केली. यावेळी दोन दुचाकीही जाळण्यात आल्या. बिगर-जाट समाजाच्या लोकांनी मोर्चा काढून या जाळपोळीचा निषेध केला. रेल्वे तिकिटाचे पैसे परतसोमवारी समझोता एक्स्प्रेस आणि दिल्ली-लाहोर बससेवा आंदोलनामुळे रद्द करण्यात आली. रेल्वे आणि बससेवा अद्याप सुरळीत सुरू न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र रद्द करण्यात आलेल्या रेल्वेच्या तिकिटांचे पूर्ण पैसे रेल्वे प्रवाशांना परत करण्यात येणार आहेत. तिकिटाचे पैसे परत करताना कॅन्सेलेशन शुल्क आकारण्यात येणार नाही आणि प्रवाशांना पूर्ण रक्कम परत केली जाईल, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.
आंदोलनाची आग विझू लागली
By admin | Published: February 23, 2016 12:26 AM