राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्यामध्ये रविवारी भीषण आग लागली. पृथ्वीपुरा-बालेटा गावाशेजारच्या जंगलात लागलेली ही आग पाहता पाहता कित्येक कमीपर्यंत पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतू पुन्हा सोमवारी दुपारी आग भडकली आणि आता ती डोंगररांगांमध्ये पसरली आहे.
गेल्या २४ तासांत छोट्याशा आगीने कित्येक किमी आतमध्ये जंगलात सारे भस्मसात केले आहे. ही आग एवढी पसरली आहे की पृथ्वीपुरा, बालेटा, भाट्याला, नया आणि प्रतापपूरा गावांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरिस्का येथे लागलेली भीषण आग विझवण्यासाठी लष्कराची दोन हेलिकॉप्टर मागविण्यात आली आहेत. ही हेलिकॉप्टर रात्री नऊ वाजता पोहोचतील. ते सिलिस्ड तलावामधून पाणी एअरलिफ्ट करतील आणि वरून पाणी टाकून आग विझवतील. गावातील लोकांना सतर्क राहण्यास सांगितले जात आहे.
सरिस्का डोंगरात लागलेल्या आगीमुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. जनावरे गावांकडे सरकल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खेड्यापाड्यात जनावरांच्या प्रवेशाची घोषणा करत पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे.
वन्य प्राणी गावाकडे, शहरांकडे धावत आहेत. आग आणि धुरामुळे इकडे-तिकडे मधमाश्या उडत आहेत आणि अधिकाऱ्यांवर हल्ला करत आहेत. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे जंगलातील आग विझवणे अधिकाऱ्यांना कठीण जात आहे, असे वन संरक्षक आर एन मीणा यांनी सांगितले आहे.