Fire at Bullet Train Station : अहमदाबादमधील निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आग लागली. ही आगीची घटना शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही आग सकाळी ६.३० वाजता लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला दोन तासांहून अधिक वेळ लागला. दरम्यान, या आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनचा मोठा भाग आगीने वेढल्याचे व्हिडिओंमध्ये दिसून येत आहे. तसेच, या घटनेवर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (NHSRLC) एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
बांधकाम सुरू असलेल्या स्टेशनच्या एका भागात छताच्या शटरिंगमध्ये आग लागल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, वेल्डिंग स्पार्कमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तपासात स्पष्ट कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
साबरमती हे स्टेशन ५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पात गुजरात (३५२ किमी) आणि महाराष्ट्र (१५६ किमी) यांचा समावेश आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, नडियाड, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ स्थानके नियोजित आहेत.