सुरत : सरथाणा परिसरात असलेल्या एका इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली आहे. या आगीमुळे इमारतीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरथाणा भागात असलेल्या तक्षशीला इमारतीला आज संध्याकाळी आग लागली. तक्षशीला ही कमर्शियल इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये काही विद्यार्थी अडकले आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी आग लागल्यामुळे घाबरुन इमारतीच्या मजल्यावरुन उड्या मारल्या. दरम्यान, घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 18 गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. तसेच, इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलिसांकडून सुरु आहे.
या दुर्घटनेत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहेत. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीने आगीची चौकशी करण्याचे आणि या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आगीच्या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत.