उत्तराखंडमधील ब्रिटानियाच्या फॅक्टरीला मध्यरात्रीच्या सुमारस भीषण आग लागली. यामध्ये करोडोंचा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाने १० बंब पाठवून जवळपास पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
ऊधमसिंहनगर जिल्ह्यातील सिडकुल ब्रिटानिया कंपनीची फॅक्टरी आहे. मध्यरात्री १ च्या सुमारास या फॅक्टरीला आग लागली. शॉर्टसर्किट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगा लागल्यानंतर आतमध्ये रात्रपाळीचे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.
यानंतर या ठिकाणी एडीएम ललित नारायण मिश्र, एएसपी मनोज कत्याल, तहसीलदार नीतू डागर आदी बडे अधिकारी देखील पोहोचले होते. कत्याल यांनी सांगितले की, आग लागल्याच्या कारणांची चौकशी केली जात आहे. आगीमुळे किती नुकसान झाले याची माहिती कंपनीचे अधिकारी गोळा करत आहेत.
रुद्रपूर आणि सिडकुल येथून अग्निशमन दलाची वाहने पोहोचली, परंतू ती अपुरी होती. म्हणून अशोका, टाटा, हिंदुस्थान झिंकसह सितारगंज, गदरपूर, काशीपूर आदी शहरांतून बंब मागविण्यात आले. सुमारे १० बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.