चंदीगड : फरिदाबादमधील सुनपेड येथे दलिताचे घर पेटवून देण्यात आल्यानंतर उफाळलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. त्या घराला बाहेरून नव्हे तर आतून आग लागल्याचा निष्कर्ष हरियाणातील न्यायवैद्यक तज्ज्ञांनी लावला असून त्यासंबंधी अहवाल सीबीआयला सादर केला आहे.न्यायवैज्ञक तज्ज्ञांसह सीबीआयच्या चमूने गुरुवारी या घराला भेट दिली. २० आॅक्टोबर रोजी समाजकंटकांनी या घराला लावलेल्या आगीत दोन बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.या घरातील खोलीत रॉकेलची अर्धवट जळालेली प्लास्टिकची बाटली, अर्धवट जळालेले बेड आढळून आले. खिडकीजवळ जळालेली आगपेटीची काडी दिसून आली.या खोलीत बाहेरून आतमध्ये कुणी प्रवेश केल्याच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नाही, असे अहवालात नमूद आहे. उच्चवर्णीयांच्या एका गटाने घराला बाहेरून आग लावल्याचा आरोप जितेंदर नावाच्या पीडिताने केला आहे. त्याचा ४ वर्षांचा मुलगा वैभव आणि ८ महिन्यांची दिव्या ही मुलगी होरपळून मृत्युमुखी पडली. ५ आॅक्टोबर २०१४ रोजी सुनपेड येथे दोन गटात झालेल्या दंगलीत उच्चवर्णीय जातीतील तिघे मारले गेले होते. त्याच्याशी जळीतकांडाचा संबंध जोडला जात होता. (वृत्तसंस्था)
‘जळीतकांडातील घराला आग आतूनच लागली’
By admin | Published: October 30, 2015 10:11 PM