भोपाळ - मध्य प्रदेशातील बैतुल येथे यंदाही दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तर, येथील एका कुटुंबात पाण्यासाठी मोठं भांडण झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पाण्यावरुन झालेल्या भांडणात या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या सुनेलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित महिला 90 टक्के भाजली आहे. महिलेस भोपाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे आपण नेहमीच ऐकतो किंवा चर्चा करताना म्हणतोही. मात्र, भोपाळच्या बैतुल येथील कलह जण भविष्यातील या घटनेची आत्ताच साक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. बडेरा येथील रहिवासी असलेल्या साहू कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून भांडण सुरू आहे. या कुटुंबात जमिनीच्या वाटणी झाल्या आहेत. त्यानुसार, कुटुंबातील राजेश यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीत सैफ्टिक टँक आहे. तर कुटुंबीयांच्या वाट्याला आलेल्या जमिनीत हँडपंप म्हणजे हापसाही आहे. या हापस्यावर पाणी भरण्यासाठी कुटुंबातील सदस्य आल्यानंतर येथे भांडण होत. कुटुंबातील सदस्यांनी राजेश आणि त्याच्या पत्नीला या हापशावरुन पाणी भरण्यास मनाई केली होती. गुरुवारी कुटुंबातील सदस्यांनी राजेशच्या पत्नीसोबत याच कारणावरुन भांडण केले. त्यावेळी रॉकेल ओतून राजेशची पत्नी द्वारका हिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी द्वारकाच्या फिर्यादीवरुन सासूर-सासऱ्यासह कुटुंबातील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदैवाने पत्नी द्वारकाच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून पती राजेश आणि तिच्या मुलीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, द्वारकाला लपेटलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, द्वारकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेत द्वारक 90 टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी सासू-सासरे, दीर-भावजय आणि चुलत सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.