जमशेदपूर - बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. रविवारी रात्री ही आग लागली होती. झारखंडमधील जमशेदपूर येथे ही घटना घडली आहे. कुमारदुबी गावातील एका इमारतील हा बेकायदेशीर कारखाना चालू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात एक मोठा स्फोट झाला, त्यानंतर ही आग लागली.
'जखमींना कम्यूनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे', अशी माहिती ग्रामीण पोलीस अधिक्षक प्रभात कुमार यांनी दिली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आठ जणांचा मृत्यू झाला असून, आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 'दुर्घटनेनंतर घरमालक दुर्गपदो फरार झाला आहे', असं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही बेकायदेशीरपणे चालणा-या या कारखान्यात छोटे-मोठे स्फोट झाले होते. पण या घटना त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचू दिल्या नव्हत्या.