मेरठ: सहारणपूर-दिल्ली पॅसेंजर ट्रेनला मेरठमधल्या दौराला रेल्वे स्थानकात सकाळी अचानक आग लागली. या आगीत रेल्वेचे दोन डबे जळून खाक झाले. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली. रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये लागलेली आग इतर डब्यांमध्ये पसरण्याचा धोका होता. मात्र प्रवाशांनी मोठा अनर्थ टाळला.
आगीची माहिती प्रवासी रेल्वेतून खाली उतरले. आग इतर डब्यांमध्ये शिरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रवासी कामाला लागले. त्यांनी रेल्वेच्या डब्यांना धक्का देण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी प्रसंगावधान राखत, कोणाचीही वाट न पाहता स्वत: अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रेल्वेचे इतर डबे आगीच्या कचाट्यात सापडू नये म्हणून प्रवाशांनी त्यांना धक्के देण्यास सुरुवात केली. एकजुटता दाखवत प्रवाशांनी सुस्थितीत असलेले डबे आग लागलेल्या डब्यांपासून वेगळे केले आणि संभाव्य नुकसान टाळलं.
रेल्वे ही आपली संपत्ती आहे. तिची काळजी घ्या, असं आवाहन वारंवार केलं जातं. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर उद्घोषणादेखील होतात. मात्र तरीही अनेकजण सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतात. मात्र आज दौराला रेल्वे स्थानकात वेगळं चित्र पाहायला मिळालं. प्रवाशांनी दाखवलेल्या एकजुटीचं, प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवाशांच्या एकजुटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.