ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाटरी गावात रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या पूरामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी बचाव पथकाला त्यांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नैसर्गिक आपत्तीत 11 जण जखमी झाले असून, अनेक घरे, दुकानांचे नुकसान झाले आहे. एका शाळेच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामध्ये काही घरे वाहून गेली तर, काही घरे कोसळली.
बचावपथकाने ढिगा-याखालून सहाजणांसह एका 12 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. बचाव पथक मुलाच्या आई-वडीलांचा शोध घेत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गावातून वाहणा-या नाल्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि घरांमध्ये पाणी घुसले. नेमके किती नुकसान झालेय ते लगेच स्पष्ट होणार नाही. आम्ही बचावमोहिमेमध्ये असून जे अडकले आहेत त्यांना वाचवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अधिका-याने दिली. जिल्हा प्रशासनासह पोलीस, लष्कर युद्धपातळीवर मदत मोहिम राबवत आहेत.
आणखी वाचा
पूरामुळे मोठमोठे दगड थाटरीच्या बाजारात वाहून आल्याने बाटोटे-दोडा-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोडा जिल्हा जम्मूमध्ये येतो. यंदाच्या मान्सूनमध्ये इथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या आठवडयाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करावी लागली होती. हा महामार्गच जम्मू आणि काश्मीर खो-याला जोडतो.
आसाम, मणिपूर आणि ओदिशामध्येही मुसळधार पावसामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल महिन्यात झेलम नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळे प्रशासनाला धोक्याचा इशारा जारी करावा लागला होता. तीनवर्षांपूर्वी 2014 मध्ये काश्मीरला पूराचा मोठा तडाखा बसला होता. लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. त्यावेळी भारतीय सैन्याने बचाव मोहिम राबवून अनेकांचे प्राण वाचवले होते.