नवी दिल्ली - दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरील मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सकाळी 6.35 वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू ही आग एच ब्लॉकच्या वार्ड क्रमांक 11 पर्यंत पोहोचली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच, तत्काळा आयसीयुमधील जवळपास 60 रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे.
सफदरगंज हॉस्पीटलकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी 6.35 वाजता आग लागली होती. त्यानंतर, लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या 9 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. याचदरम्यान, रुग्णायातील स्टाफच्या सहाय्याने आयसीयु वार्डमधील 60 रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सध्या आग विझविण्यात आली असून सर्वचजण सुरक्षित असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटलंय. यासंदर्भात आज तकने वृत्त दिलंय.
अग्निशमन दलाचे अधिकारी अतुल गर्ग म्हणाले की, जेव्हा आग लागली तेव्हा आयसीयुच्या आतमध्ये 60 रुग्ण दाखल होते. त्यामुळे, या सर्वांनाच प्राधान्याने रुग्णालयातून बाहेर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मात्र, आयसीयु विभागातील सर्व मशिन्स आणि सामान जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, असेही गर्ग यांनी सांगितले.