बटाला - पाकिस्तान सीमेनजीक असणाऱ्या गुरुदासपूर येथील बटाला शहरात बुधवारी भीषण स्फोट झाला. फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाने संपूर्ण शहर हादरुन गेलं. यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेत फटाक्यांचा कारखान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तसेच आसपासच्या इमारतींमध्येही मोठं नुकसान झालं आहे. घटनास्थळी सध्या प्रशासनाकडून मलबा काढण्याचं काम सुरु आहे. बचावकार्य सुरु असतानाही याठिकाणी स्फोट झाले. त्यामुळे पोलीस आणि जवानांही धोका निर्माण झाला आहे. मलब्यात आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे जवान शोधकार्य करत आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेकांची या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेची न्यायलयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
स्फोटाची तीव्रता अधिक बटाला शहरात झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी होती की घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला. कारखान्यात उभी असणारी कार 300 मीटर दूर फेकली गेली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या 2 युवकांचा जळून मृत्यू झाला. 200 मीटर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. या स्फोटानंतर घटनास्थळावर रात्री उशिरापासून बचावकार्य सुरु आहे.
या कारखान्याच्या मालकाचे 5 कुटुंब सदस्यही मलब्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. स्फोटात मालकाचा आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार स्फोट प्रचंड भयंकर होता. पीडित लोक स्फोटामुळे दूरवर फेकले गेले. स्फोटामुळे सगळे नागरिक घराबाहेर पडले. घटनास्थळावर आरडाओरडा सुरु झाला.
हा कारखाना बटालाजवळील हंस ली पुल येथे आहे. ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा मोठ्या संख्येने कर्मचारी कारखान्यात हजर होते. मलब्यातून आतापर्यंत 31 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.