Tamil Nadu Fire : तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये अल्पवयीन मुलाचीही समावेश असल्याचे समोर आलं आहे. सर्वजण रुग्णालयाच्या लिफ्टमध्येही बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. या आगीत २० जण जखमी झाले असून ३० हून अधिक बचावले आहेत. रुग्णालयात आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांसह ५० हून अधिक रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या होत्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
तामिळनाडूतील दिंडीगुल येथील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री ९ वाजता घडली. त्रिची रोडवरील ऑर्थोपेडिक केअर सिटी हॉस्पिटलच्या रिसेप्शन परिसरात ही आग लागली, जी संपूर्ण इमारतीत पसरली. घटनेच्या वेळी रुग्णालयात ३० हून अधिक रुग्ण होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. आगीमुळे रुग्णालयातील अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे.
लिफ्टमध्ये सापडलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभागाकडून रुग्णालयात शोध आणि बचाव कार्य सुरू असताना या पीडितांचा लीफ्टमध्ये श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला होता. पोलीस आणि अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रुग्णालयात आग लागल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली होती.
दरम्यान, महिन्याभरापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास उत्तर प्रदेशच्या झाशी मेडिकल कॉलेजच्या स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली होती. या घटनेत १० नवजात बालकांना जिवंत जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी ७ जळालेल्या मुलांना आपला जीव गमवावा लागला. वॉर्डाची खिडकी तोडून ३९ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यापैकी सात मुलांचा मृत्यू झाला होता. हे सर्वजण ८० टक्क्यांहून अधिक भाजले होते.