तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात असलेल्या फटाक्याच्या फॅक्टरीला बुधवारी भीषण आग लागली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भाजलेल्या लोकांपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांचीपुरम जिल्ह्यातील फटाक्यांच्या फॅक्टरीला आग लागली.
फॅक्टरीला आग लागताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. लोकांनी लगेचच अग्निशमन दल आणि पोलिसांना आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांसह रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. कर्मचार्यांनी फॅक्टरीतून जवळपास 27 लोकांना वाचवले.
गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी जवळपासच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी आठ जणांना मृत घोषित केले. तसेच 19 जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फटाक्यांच्या फॅक्टरीला आग कशी लागली याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. आगीचे कारण शोधण्यासाठी कांचीपुरम पोलीस तपास करीत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"