नवी दिल्ली - गाझियाबाद स्टेशनवर शताब्दी एक्स्प्रेसला आग (Fire in Shatabdi Express) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला शनिवारी पहाटे आग लागली आहे. यामुळे रेल्वेतील प्रवासी खूपच घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.45 वाजल्याच्या सुमारास ही रेल्वे गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. तेव्हा या गाडीच्या पार्सल कोचमध्ये आग लागली.
आगीची माहिती मिळाताच रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी थोड्याच वेळात या आगीवर नियंत्रण मिळवलं. रेल्वेच्या इतर डब्यांना मात्र या आगीमुळे कोणतीही हानी झालेली नाही. रेल्वेला लागलेल्या आगीमागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. सकाळी सात वाजल्यादरम्यान अग्निशमन दलाला रेल्वेत आग लागल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवान करण्यात आल्या होत्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. याआधी दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका बोगीला आग लागली होती. उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये बुधवारी एक मोठी रेल्वे दुर्घटना (Train Accident) टळली. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस (Purnagiri Jansatabdi) अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले.
बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा पूर्णागिरी जनशताब्दी एक्स्प्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले. उत्तराखंडमध्ये एका आठवड्यात ही दुसरी रेल्वे दुर्घटना घडली. चंपावत पोलीस अधीक्षक लोकेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णगिरी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाला रेल्वे रुळावरवर प्राणी दिसताच त्याने दुर्घटना टाळण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. पण यानंतर चालकाचा इंजिनावरील ताबा सुटला आणि संपूर्ण ट्रेन उलट दिशेने धावू लागली. यावेळी ट्रेनचा वेगदेखील सामान्य होता. ट्रेन चकरपूरमध्ये थांबवण्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.