झाशी येथील मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीच्या घटनेत १० नवजात बाळांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा रिपोर्ट आता तयार झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून त्यामध्ये कोणतेही षडयंत्र किंवा निष्काळजीपणा समोर आलेला नाही.
घटनेच्या वेळी एनआयसीयू वॉर्डमध्ये ६ नर्स, इतर कर्मचारी आणि २ महिला डॉक्टर उपस्थित होत्या. स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडली आणि आग लागली. स्वीच बोर्डाला लागलेली आग वॉर्डात लावलेल्या मशिन्सच्या प्लॅस्टिक कव्हरपर्यंत पोहोचली आणि प्लॅस्टिकच्या कव्हरमधून आग वेगाने पसरली. त्यानंतर खळबळ उडाली.
ड्युटीवर असलेल्या एका नर्सने आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला ज्यामध्ये तिचे हात-पाय भाजले आणि कपडे देखील जळाले. झाशी मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या या घटनेत कोणताही कट नाही, त्यामुळे आतापर्यंत एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
डीजीएमईच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या सविस्तर रिपोर्टमध्ये शॉर्ट सर्किट कसे झाले हे उघड होईल? प्रभागात बसवलेल्या मशिनवर ओव्हरलोड होता, त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले का? याचाही तपास सुरू आहे. झाशीचे आयुक्त आणि डीआयजी यांच्या समितीने घटनेच्या वेळी उपस्थित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रिपोर्ट तयार केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
एनआयसीयू वॉर्डमध्ये नवजात बालकांची संख्या जास्त असल्याने पाण्याचे स्प्रिंकलर बसवले जात नसल्याचं डॉक्टरांनी चौकशी समितीला सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विच बोर्डमध्ये ठिणगी पडल्याने आग लागली. एका नर्सने स्वत:च ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ती जखमीही झाली. यावेळी आग ऑक्सिजन केंद्राकडे पसरू लागली.
एक पॅरामेडिकल कर्मचारी अग्निशामक यंत्र घेऊन आत गेला. त्याच्या पाठोपाठ आणखी दोन कर्मचारी आणखी तीन अग्निशामक यंत्रांसह आत गेले. चौघांचा वापर करण्यात आला मात्र तोपर्यंत आग बरीच पसरली होती. अग्निशमन दलाच्या गाड्याही माहिती मिळताच आठ मिनिटांत पोहोचल्या. सरकारने झाशीचे आयुक्त विपुल दुबे आणि झाशीचे डीआयजी रेंज कलानिधी नेथानी यांच्याकडून २४ तासांत या घटनेचा रिपोर्ट मागवला होता.