मध्य प्रदेशच्या हरदा येथील फटाक्यांच्या फॅक्ट्रीतील स्फोटानंतर फटाका फॅक्ट्रीचा मालक राजेश अग्रवालचं घर बुलडोझरने पाडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत फॅक्ट्री मालकाचे तीन मजली घर आहे. त्याच्या घरावर देखील फटाक्यांची मोठी जाहिरातही लावण्यात आली आहे. या घटनेनंतर राजेश अग्रवालचं संपूर्ण कुटुंब फरार आहे. राजेश अग्रवालने घरातच गोडाऊन बनवून फटाक्यांचा साठा करून ठेवल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे, त्यामुळेच परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राजेश अग्रवालचं घर बुलडोझरने पाडण्याची मागणी शेजाऱ्यांनी केली आहे. फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर अग्रवाल कुटुंबातील लोक घराला कुलूप लावून कुठेतरी निघून गेले आहेत.
प्रशासनाने अद्याप आरोपीचं घर तपासासाठी सील केलेलं नाही. घरातील सदस्य निघून गेल्याने घराला कुलूप आहे. घरातही फटाके असल्याचं शेजाऱ्यांचं म्हटलं आहे. हरदा शहरात मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर 174 जण जखमी झाले. लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली.
नर्मदापुरम विभागाचे आयुक्त पवन शर्मा य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 174 जणांना घटनास्थळावरून वाचवण्यात यश आले असून, त्यापैकी 34 जणांना भोपाळ आणि होशंगाबादला पाठवण्यात आले आहे, तर 140 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेफर करण्यात आलेल्या लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला असून जिल्हा रुग्णालयात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.