कोरोनानं मृत्यू झालेल्या १ हजार मृतदेहांना अग्नी देणाऱ्याची हृदयपिळवटून टाकणारी कहाणी, सर्पदंशानं झाला मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:20 PM2022-03-29T20:20:08+5:302022-03-29T20:21:00+5:30
इंदूरचा 'जिंदा भूत' नावानं ओळखले जाणारे प्रदीप कनोजिया आता भोपाळच्या भदभदा स्मशान घाटावर दिसणार नाहीत. गेल्या ३० वर्षांपासून प्रदीप कनोजिया भोपाळमधील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत होते.
भोपाळ-
इंदूरचा 'जिंदा भूत' नावानं ओळखले जाणारे प्रदीप कनोजिया आता भोपाळच्या भदभदा स्मशान घाटावर दिसणार नाहीत. गेल्या ३० वर्षांपासून प्रदीप कनोजिया भोपाळमधील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत होते. सर्पदंशानं त्यांचा मृत्यू झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये त्यांना कधीच विषाणूचा संसर्ग झाला नाही. त्यांना कधीही कुणी विचारलं तर ते 'मी स्वत: जिवंत भूत आहे', असं मस्करीत म्हणायचे.
कोरोनाच्या काळात भीतीपोटी कुटुंबीय आपल्या प्रियजनांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येत नसताना त्यांनीच हजाराहून अधिक मृतदेहांना अग्नी देण्याचं काम केलं होतं. या कामासाठी त्यांना पोलिसांकडून 'कोरोनावीर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
मूळचे इंदूरचे रहिवासी असलेले प्रदीप कनोजिया उर्फ दल्ली भैया यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. २३ मार्च रोजी ते भोपाळ पोलीस लाइन्सच्या २५ व्या बटालियनमधील एका घरात आढळून आलेल्या सापाची सुटका करण्यासाठी पोहोचले होते. तांनी सापाला पकडलं होतं पण पेटीत बंद करत असतानाच सापानं त्यांना दंश केला. त्यांना हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं सहा दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी केला होता सन्मान
"प्रदीप यांनी कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये रात्रंदिवस काम केलं. भोपाळ पोलिसांनी त्यांना 'कोरोनावीर' पुरस्काराने सन्मानित केलं होतं", असं प्रदीप यांच्या मावशीचा मुलगा राजेश कनोजिया यांनी सांगितलं. प्रदीपसोबत काम केलेले भगवान सिंह यांनी प्रदीप कधीच ड्युटी एवढंच काम करत नसत. कोणीही फोन केला की ते हजर असायचे. कोरोनाच्या काळात अनेकवेळा असे लोक आले, ज्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते अशा परिस्थितीत दिल्ली भैय्यानं आपल्या खिशातून पैसे खर्च करुन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असं सांगितलं.
दोन वर्षांपूर्वीही झाला होता सर्पदंश
अंत्यसंस्कार व्यतिरिक्त प्रदीप साप आणि विंचू पकडण्याचंही काम करायचे. त्यांना शहरातील लोकांनी साप आणि विंचू पकडण्यासाठी बोलावलं होतं. दोन वर्षांपूर्वीही त्यांना सर्पदंश झाला होता. त्यावेळीही ते अनेक दिवस रुग्णालयात होते. पण ते उपचारानंतर बरे झाले होते.