नवी दिल्ली : सर्वाेच्च न्यायालयाने यावर्षी फटाकेबंदीबाबत अतिशय कठाेर निर्देश दिले हाेते. मात्र, न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून देशभरात माेठ्या प्रमाणावर फटाके फाेडण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय धाेकादायक पातळीवर आली आहे. तर आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अजूनही महामार्ग माेकळे केलेले नाहीत.
सर्वाेच्च न्यायालयाने फटकेबंदीसंदर्भात आदेश देताना सर्व राज्यांचे मुख्य सचिव, पाेलीसदल प्रमुख, पाेलीस आयुक्त, पाेलीस अधीक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाईचा इशारा दिला हाेता. न्यायालयाने सरसकट फटाकेबंदी घातली नव्हती. मात्र, ग्रीन क्रॅकरला परवानगी दिली हाेती. तर दिल्ली सरकारने सरसकट फटाकेबंदी घातली हाेती. तरीही दिल्लीसह देशभरात माेठ्या प्रमाणावर आतषबाजी झाली. त्यामुळे दिल्लीकरांना वायुप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. दिल्लीत जनपथ, गाझियाबाद, नाेयडा इत्यादी ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक धाेकादायक श्रेणीत पाेहाेचला. जनपथ येथे ६५५.०७ एवढी पीएम २.५ पातळी पाेहाेचली हाेती. रविवारपर्यंत यात सुधारणा हाेण्याची शक्यता नाही.
न्यायालयाच्या आदेशानंतरही महामार्ग बंदच
सर्वाेच्च न्यायालयाने शाहीन बाग आंदाेलनप्रकरणी रस्ता माेकळा करण्याचे निर्देश दिले हाेते. आंदाेलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. मात्र, रस्ते आणि मार्ग राेखून आंदाेलन करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले हाेते. त्याचप्रकारे दिल्लीच्या सीमेवर आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्यायालयाने आदेश दिले हाेते. मात्र, संयुक्त किसान युनियनने याप्रकरणी न्यायालयात उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी अजूनही महामार्गावर आंदाेलन करीत आहेत.