जम्मू : जम्मू जिल्ह्यातील अर्निया व आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स व बीएसएफ जवानांतील गोळीबाराचे सत्र शुक्रवारी पहाटे संपले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानी रेंजर्सच्या बेछूट गोळीबारानंतर रात्री सीमावर्ती वस्त्यांमधून पलायन केलेली अनेक कुटुंबे आता घरी परतू लागली आहेत.
गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेवरील पाच भारतीय चौक्यांना लक्ष्य करून सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. त्याला बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिले. ‘गोळीबार आता थांबला असून, शांतता आहे’, असे एका वरिष्ठ बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले. पहाटे तीन वाजेपर्यंत दोन्ही पक्षांत अधूनमधून गोळीबाराच्या फैरी झडत होत्या, असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबारात गुरुवारी रात्री २ बीएसएफ जवान व एक महिला जखमी झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जवानाला जम्मूच्या रुग्णालयात हलवण्यात आले. कर्नाटकातील एस. आर. बसवराज आणि शेर सिंग अशी जखमी जवानांची नावे आहेत तर रजनी बाला असे जखमी महिलेचे नाव आहे. (वृत्तसंस्था)
मजुरांनी वस्त्या सोडल्या
पाकिस्तान रेंजर्सनी ८२ आणि १२० मिमी उखळी तोफांचा मारा केला आणि अवजड मशीन गनद्वारे गोळीबार केला, त्यामुळे सीमेवरील रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारामुळे अर्निया, ट्रेवा, सुचेतगढ आणि जबोवालमधील अनेक लोक, विशेषत: स्थलांतरित मजुरांनी वस्त्या सोडल्या.