नवी दिल्ली : दिल्लातील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट क्रमांक 5 जवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. हा गोळीबार रविवारी रात्री उशिरा करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
जामिया कॉर्डिनेशन कमिटी (जेसीसी)च्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या गेटवजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.त्यानंतर ते फरार झाले. हे हल्लेखोर लाल रंगाच्या स्कुटीवरून आले होते. एकाने लाल रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तसेच, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, गोळीबाराची माहिती समजताच स्थानिक लोक घटनास्थळी दाखल आले आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 27 (शस्त्रे वापरण्याच्या शिक्षे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसात दिल्लीतील जामिया विद्यापीठ परिसरात गोळीबार केल्याची ही तिसरी घटना आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठीत गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. गेल्या गुरुवारी रामभक्त गोपाल या एका व्यक्तीने आंदोलकांवर गोळीबार केला होता. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. विशेष म्हणजे, या व्यक्तीने गोळीबार करण्याच्या काही वेळ आधी फेसबुक लाईव्ह केले होते. तर, शनिवारी शाहीन बाग परिसरात कपिल गुर्जर नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला होता. कपिल गुर्जरने आंदोलन स्थळापासून काही अंतरावर हवेत गोळीबार केला होता.