श्रीनगर, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. काश्मीर खो-यात सातत्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवाया सुरु असून, यापूर्वी सुद्ध अनेकवेळा दहशतवाद्यांनी लष्करी तळाला लक्ष्य केले आहे.
रात्रीच्या सुमारास दहशतवाद्यांनी कालारुस येथील लष्करी इमारतीवर गोळीबार केला. यामध्ये जम्मू-काश्मीर लाईट इनफँट्री 17 चे जवान सुनील रंधावा जखमी झाले. त्यांना द्रुगमुल्ला येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गोळीबार करणा-या दहशतवाद्यांनी हुडकून काढण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी या भागात शोधमोहीम सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा बुधवारी खात्मा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल सेक्टमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक झाली. यावेळी सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
चकमकीत ठार केलेले दहशतवाद्यांदी अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा विभागीय कमांडर झाकिर मुसा याच्या ग्रुपमधील होते. खात्मा करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे जाहिद आणि इसहाक अशी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाने आपले जाळे काश्मीरमध्ये पसरवण्यासाठी घाजवट-उल-हिंद संघटनेची स्थापना केली. या संघटनेची जबाबदारी झाकिर मुसा याच्याकडे सोपविली आहे.
जवानांवर दगडफेक करत दहशतवादी झाकीर मूसाला पळवलं ? हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मूसा सुरक्षा जवनांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सुरक्षा जवनांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी त्राल येथील नुरपूरामधील पैतृक परिसरातील एका घरात झाकीर मूसा लपला असल्याची माहिती मिळाली होती. झाकीर मूसा आपल्या एका सहका-यासोबत लपला असल्याच पक्की माहिती सुरक्षा जवानाकडे होती. मात्र त्याला पकडण्यासाठी जवान पोहोचले तेव्हा त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेक करत जवानांना अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. स्थानिक लोक दगडफेक करत झाकीर मूसा आणि त्याच्या सहका-याला पलायन करण्यासाठी मदत करत होते.