कोहिमा - नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात झालेल्या १४ सामान्य नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना कशी घडली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गुप्तहेर खात्याचे अपयश नव्हते. बंडखोर गटाचे लोक कुठे जात आहेत, याबाबत सुरक्षा यंत्रणांना विश्वसनीयरीत्या इनपुट देण्यात आले होते. नागालँडमधील मोन जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशा गोळीबाराच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये सुमारे १४ लोक मारले गेले होते. तर अन्य ११ जण जखमी झाले होते. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार गोळीबाराची ही घटना चुकीच्या ओळखीमुळे झाली असावी. दरम्यान, या घटनेनंतर झालेल्या दंगलीमध्ये एका जवानाचाही मृत्यू झाला आहे.
सूत्रांनी सांगितले की, दोन एजन्सींकडून गोपनीय माहितीची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सेना आणि टास्क फोर्सचा समावेश आहे. मात्र गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, अखेरच्या क्षणी कुणीतरी फुटीरतावाद्यांना माहिती दिली आणि त्यांनी या आंदोलनात स्थानिक लोकांना सामावून घेण्यात यश मिळवले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार टास्क फोर्सला यामध्ये सामान्य नागरिक सहभागी झाले आहेत याची माहिती नव्हती. एवढेच नाही तर यादरम्यान, अॉपरेशनची तयारी करण्यात आली. मात्र ग्रामस्थांनी बंडखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते मारले गेले, असाही दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, लष्कराने या घटनेच्या कोर्ट अॉफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. तसेच यादरम्यान एक जवान मृत्युमुखी पडला तर इतर काही जवान जखमी झाले. ही घटना आणि त्यानंतर घडलेली घटना हे सारे काही दुर्दैवी असल्याचे लष्कराने म्हटले आहे. घटनेची उच्च स्तरीय चौकशी सुरू आहे. नागालँडमधील सरकारने आयजीपी नागालँड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
गोळीबाराची ही घटना शनिवारी तेव्हा घडली होती जेव्हा संध्याकाळी काही खाण कामगार पिक अप गाडीमधून गात घरी जात होते. दरम्यान, लष्कराच्या जवानांना एका बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेच्या हालचालींची माहिती मिळाली होती. त्याच गैरसमजातून जवानांनी गोळीबार केला आणि त्यात ही दुर्घटना घडली.