नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावरील गोळीबाराची घटना ताजी असताना आज शाहीन बाग परिसरात गोळीबार झाला. आंदोलन स्थळापासून काही अंतरावर एका व्यक्तीनं हवेत गोळीबार केला. आरोपीनं दोन-तीन गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आमच्या देशात केवळ हिंदूंचा दबदबा राहील. इतर कोणाचाही नाही, असं या व्यक्तीनं पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर म्हटलं. आरोपीनं स्वत:चं नाव कपिल गुर्जर असल्याचं सांगितलं. तो नोएडाच्या सीमेवरील दल्लुपुराचा रहिवासी आहे. कपिलनं हवेत गोळीबार केल्यानंतर लगेचच त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त चिन्मय विस्वाल यांनी दिली. कपिलला सरिता विहार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेताच कपिलनं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं कपिलला तू गोळी का झाडलीस, असा प्रश्न विचारला. त्यावर आपल्या देशात असं काही व्हावं असं वाटत नाही. आपला देश हिंदू राष्ट्रवादी आहे, असं उत्तर कपिलनं दिलं. गुरुवारी (परवा) जामिया नगरमध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे विद्यार्थी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी एका अल्पवयीन मुलानं मोर्चावर गोळीबार केला. यामध्ये जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना हा प्रकार घडला. यानंतर दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.