जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतीय चौक्यांना लक्ष्य करणं पाकिस्तानी सैन्याला चांगलंच महागात पडलं आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानी सैन्याचं जबर नुकसान झालं असून, या कारवाईत सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात असलेल्या नियंत्रण रेषेजववळील चौक्यांवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला होता. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं. तसेच पाकिस्तानी सैन्याला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. तसेच भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच अनेक सैनिक जबर जखमी झाले, सुरक्षा अधिकाऱ्यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी जम्मू जिल्ह्यातील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्करातील एका कॅप्टनसह दोन जवानांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंघीचं उल्लंघन करून गोळीबार करण्याची आगळीक घडली आहे.
या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पाकिस्ताननी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर ताराकुंडी क्षेत्रामध्ये भारतीय लष्कराच्या आघाडीच्या चौक्यांवर अचानक गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईमध्ये शत्रूसैन्याचं मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे.