Firing at Train : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघात घडवण्यासाठी ट्रॅकवर स्फोटके किंवा लोखंडी पोल ठेवण्याच्या घटना घडत आहेत. याशिवाय, अनेकदा ट्रेनवर दगडफेक झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. पण, आता ओडिशात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील भद्रक जिल्ह्यात मंगळवारी एका धावत्या ट्रेनवर अज्ञातांनी गोळीबार केला, यामुळे ट्रेनमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
याप्रकरणी जीआरपीने तपास सुरू केला आहे. सुदैवाने चारम्पा स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी नंदन कानन एक्स्प्रेस सुरक्षित केली आणि ती पुढे पुरीला पाठवण्यात आली आहे.
रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, 12816 आनंद विहार-पुरी नंदन कानन एक्स्प्रेसवर गोळीबार झाला. गार्ड व्हॅनच्या खिडकीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत खिडकीच्या काचा फुटल्या. या प्रकरणाचा आता जीआरपीकडून तपास सुरू आहे.
प्रवासी घाबरलेही घटना ओडिशातील भद्रक-बौदपूर विभागात सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. ट्रेन सकाळी 9.25 वाजता भद्रक स्टेशनवरून निघाली असता पाच मिनिटांनी गोळीबार झाला. या घटनेने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. ट्रेनमध्ये झालेल्या या गोळीबाराचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये गोळीबारामुळे खिडकीची काच फुटल्याचे दिसत आहे.