ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 31 - पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतात दिवाळीचा उत्साह असताना रविवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील आर.एस.पुरा सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला आहे. रात्री 9 वाजता सुरू झालेला हा गोळीबार मध्यरात्री 3.30 पर्यंत सुरू होता. तुफान गोळीबार करत पाकिस्तानने भारतीय पोलीस चौक्यांना, नागरिकांना टार्गेट केले. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे सीमारेषेजवळील गावात राहणा-या नागरिकांचे जगणं मात्र मुश्किल झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याने सीमेजवळच्या अनेक गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत.
पाकिस्तानने गेल्या तीन दिवसांत केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत पाकिस्तानचे सैनिकदेखील मारले गेले आहेत.
J&K: Ceasefire violation by Pakistan in R S Pura sector and Suchetgarh sector— ANI (@ANI_news) October 30, 2016