ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने दगाबाजी सुरु असताना भारत सरकार सोमवारी सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार आहे. कझाकस्तान येथे शांघाय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामध्ये झालेल्या अनौपचारिक भेटीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या कैद्यांनी त्यांची शिक्षा भोगून पूर्ण केलेली असल्यामुळे पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर भारताकडून प्रथमच अशा प्रकारे कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे.
अस्ताना येथे झालेल्या मोदी-शरीफ भेटीनंतर हा निर्णय झाल्याने या कैद्यांच्या सुटकेला एक वेगळे महत्व आहे. नवाझ शरीफ यांच्या शस्त्रक्रियेनंतर प्रथमच या दोन नेत्यांची भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी शरीफ आणि त्यांच्या आईच्या तब्येतीचीही विचारपूस केली.
मागच्याच आठवडयात भारताने अली रझा (11) आणि बाबर (10) या दोन लहान मुलांना पाकिस्तानच्या ताब्यात सोपवले. ही दोन्ही मुले चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत आली होती. त्यांचे काका मोहम्मद शहजादही त्यांच्यासोबत होते. भारताने दोन्ही लहान मुलांची सुटका केली पण मोहम्मद शहजाद यांना मात्र सोडलेले नाही. खरतर एप्रिल महिन्यातच या दोन मुलांची सुटका होणार होती. पण कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारताने आपला निर्णय बदलला.
आम्ही मानवतेच्या आधारावर कैद्यांची सुटका करत आहोत. त्याचा अन्य कशाशी संबंध जोडू नये असे भारतीय अधिका-यांनी म्हटले आहे. पाकिस्तानही त्यांच्या ताब्यातील भारतीय कैद्यांची सुटका करेल अशी सरकारला अपेक्षा आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 132 भारतीय कैदी पाकिस्तानी तुरुंगात असून त्यातील 57 कैद्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाली आहे.
कझाकिस्तानमध्ये मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात कझाकिस्तानमध्ये भेट झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन(SCO)शिखर संमेलनाच्या आधी दोन्ही नेत्यांनी लीडर्स लाऊंजमध्ये एकमेकांना अभिवादन केलं.