सातारारोडमध्ये गोळीबार, तलवार हल्ला
By admin | Published: June 29, 2015 12:38 AM
ग्रामपंचायत निवडणुकीतून वैमनस्य : दोघे गंभीर जखमी; माजी उपसरपंचास अटक; गावात तणाव
ग्रामपंचायत निवडणुकीतून वैमनस्य : दोघे गंभीर जखमी; माजी उपसरपंचास अटक; गावात तणावकोरेगाव / सातारारोड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच व त्याच्या साथीदारांनी एका व्यापार्यावर गोळीबार व तलवार हल्ला केला. अशोक शिवराम फाळके (५३) असे यात जखमी झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. सातारारोड-पाडळी स्टेशन ग्रामपंचायतीची निवडणूक दोन महिन्यांपूर्वी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत दोन पॅनेलमध्ये लढत झाली. त्यात माजी उपसरपंच किशोर फाळके याच्या पॅनेलचा पाडाव झाला; मात्र तो स्वत: निवडून आला. किशोर व अशोक फाळके यांच्यामध्ये घरगुती कारणाबरोबरच निवडणुकीवरूनही वाद होता. विरोधी पॅनेलचे काम केल्याने किशोर फाळके याचा अशोक यांच्यावर राग होता. रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास अशोक हे दुचाकीवरून सातारारोड बाजारपेठेत आले होते. त्यावेळी किशोर फाळके याच्यासह चौघे तेथे आले आणि किशोर याने दोन गोळ्या अशोक यांच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या पायात घुसली. त्यानंतर अन्य तिघांनी अशोक यांच्यावर तलवारीने वार केले आणि पळून गेले. अशोक फाळके यांना सातारच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने आधी सातारच्या खासगी रुग्णालयात आणि नंतर पुणे येथे नेण्यात आले. (प्रतिनिधी)----किशोर फाळके याचे वडील संपत यांच्या डोक्यावर अशोक फाळके यांनी तलवारीने वार केल्याने ते जखमी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरूआहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.