उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर शनिवारी ३.३० वाजता भीषण अपघात झाला. भाविकांनी भरलेली बस पलटी झाल्याने ३० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून ती एक्स्प्रेस वेवर उलटली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेली बस छत्तीसगडहून येत होती. ६५ प्रवासी होते, त्यापैकी ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. नसीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माईलस्टोन ५१ येथे ही घटना घडली. सर्व लोक छत्तीसगडचे रहिवासी असून ते वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन वृंदावनला आले होते आणि शुक्रवारी रात्री छत्तीसगडला परत जात होते.
बस पलटी झाल्याची माहिती मिळताच एक्स्प्रेस वेवर उपस्थित कर्मचारी आणि नसीरपूरचे निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने जखमींना बाहेर काढून फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं. नसीरपूरचे इन्स्पेक्टर शेर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाला झोप लागली होती, त्यामुळे बस उलटली.
जखमी प्रवाशाने सांगितलं की, बसमध्ये ६५ प्रवासी होते. आम्ही वैष्णोदेवीहून वृंदावनला आलो आणि वृंदावनहून आता छत्तीसगडला घरी जाणार होतो. बसमधील बहुतांश प्रवासी जखमी झाले आहेत. शिकोहाबाद रुग्णालयाचे डॉक्टर शिवकुमार कर्दम यांनी याबाबत माहिती दिली. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना सैफई येथे रेफर करण्यात आले असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.