पॅरिस : भारताने फ्रान्सकडून घेतलेल्या अफाट मारकशक्तीच्या व अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी सोमवारी फ्रान्समधून भारताकडे रवाना झाली. दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून एकूण ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना घेण्याचा करार भारताने चार वर्षांपूर्वी केला होता व दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची अडचण येऊनही कंपनीने त्यापैकी पहिल्या तुकडीतील विमाने ठरल्यावेळी सुपूर्द केली आहेत.
भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ यांनी ही विमाने घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांशी मेरीग्नॅक हवाईतळावर बातचीत करून त्यांना शुभेच्छापूर्वक निरोप दिला.
राजदूत अश्रफ यांनी या विमानांना निरोप देतानाचा एक व्हिडिओदेखिल भारताच्या फ्रान्समधील वकिलातीने प्रसिद्ध केला. त्यात विमाने घेऊन जाणाºया वैमानिकांना उद्देश्ून राजदूत म्हणाले की, आमच्या हवाईदलाने ही विमाने प्रत्यक्ष वापरून पाहिली आहेत व ती अत्यंत चपळ, अचूक,बहुपयोगी व घातक मारा करू शकणारी असल्याची पोंचपावती त्यांनी मिळविली आहे. ही सर्वोत्तम वैमानिकांकडून चालविली जाणारी सर्वोत्तम लढाऊ विमाने आहेत. थोडक्यात त्यांना तुम्ही ‘ब्युटी’ व ‘बीस्ट’असे दोन्हीही म्हणू शकता.
विमाने ठरल्यावेळी सुपूर्द केल्याबद्दल उत्पादक कंपनीला धन्यवाद देत राजदूत अश्रफ म्हणाले की, या शक्तिशाली विमानांच्या ताफ्याने आमच्या संरक्षणसिद्धतेतील हवाई बाजूला खूपच बळकटी मिळेल. शिवाय भारत व फ्रान्स यांच्यातील सामरिक भागिदारीचीही ही विमाने म्हणजे प्रतिक आहेत. (वृत्तसंस्था)7000किलोमीटरचा प्रवासमॅरिग्नॅक हवाईतळावरून ही विमाने बॉर्डेक्स या बंदराच्या शहरात गेली. तेथून ती भारतापर्यंतचा सात हजार किमीचा प्रवास करताना एकदा हवेतच इंधन भरून घेतील व संयुक्त अरब अमिरातींमध्ये एक थांबा घेऊन बुधवारी अंबाला येथील भारतीय हवाईदलाच्या तळावर दाखल होतील.
आमच्या हवाईदलाने ही विमाने प्रत्यक्ष वापरून पाहिली आहेत व ती अत्यंत चपळ, अचूक,बहुपयोगी व घातक मारा करू शकणारी असल्याची पोंचपावती त्यांनी मिळविली आहे. थोडक्यात त्यांना तुम्ही ‘ब्युटी’ व ‘बीस्ट’असे दोन्हीही म्हणू शकता.- जावेद अश्रफ,भारताचे फ्रान्समधील राजदूत