झारखंडमधील हजारीबाग येथील रुग्णालयात नवजात अर्भकांची अदलाबदली होण्याचा विचित्र प्रकार घडला. रुग्णालयात बाळ बदलले गेल्याच्या प्रकरणाची एवढी चर्चा झाली की, स्थानिक आमदार मनीष जयस्वाल यांना रुग्णालयात जाऊन दोन्ही कुटुंबांची समजूत काढावी लागली. अखेरीस डीएनए चाचणी करून बाळ सुपूर्द करण्याचं निश्चित करण्यात आलं. तोपर्यंत मुलाला रुग्णालय व्यवस्थापनाने आपल्या ताब्यात ठेवले आहे. तर मुलगी कथित कुटुंबासोबत आहे.
हा संपूर्ण प्रकार इटखोरी येथील रहिवासी असलेल्या शोभा देवी यांच्यासोबत घडला आहे. शोभा देवी यांनी मुलाला जन्म दिला होता. कुटुंबीयांना सांगण्यात आलं की, त्यांना मुलगा झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी मुलाला हातात घेऊन खेळवले. त्यानंतर त्याला पुन्हा नर्सच्या स्वाधीन केले.
मात्र पुन्हा जेव्हा मूल तिच्याकडे देण्यात आलं तेव्हा ती मुलगी होती. त्यावरूनच वादाला सुरुवात झाली. शोभा देवी यांचे नातेवाईकांनी त्यांच्या मुलाला बदलण्यात आल्याचा आरोप केला. तर दुसरं कुटुंब बडकागांव येथील रहिवासी आहे. तिचं नाव दीपिका आणि पतीचं नाव चतुर्भूज कुमार आहे. त्यांनाही संध्याकाळी मुलगा झाला होता. त्यांच्याच मुलाला रुग्णालय प्रशासनाने चुकून शोभा देवीकडे दिलं होतं, असं सांगण्यात येत आहे. मात्र सध्या या प्रकरणाची खूप चर्चा होत आहे.
दरम्यान, आमदार मनीष जयस्वाल यांनी प्रकरण शांत करताना दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढली. त्यानंतर डीएनए चाचणी करून मुलगा ज्याचा असेल त्याला सुपूर्द करण्यात यावा, यावर दोन्ही कुटुंबीय सहमत झाले. तोपर्यंत हे बाळ रुग्णालय प्रशासनाकडे राहील. आता रुग्णालय प्रशासन या मुलाची डीएनए चाचणी कधी करते आणि मुलाचा ताबा त्याच्या खऱ्या पालकांकडे देते हे पाहावे लागेल.