देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सध्या यावर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या देशात नागरिकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी देण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं रशियाच्या SputnikV या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मान्यता दिली होती. दरम्यान, आज SputnikV ची दीड लाख डोसची पहिली खेप भारतात पोहोचली.शनिवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास रशियाच्या विमानातून SputnikV ची पहिली खेप भारतात पोहोचली. आजपासूनच देशात १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. SputnikV भारतात पोहोचल्यानं या मोहीमेला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतानं SputnikV या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मंजुरी दिली होती. दरम्यान, आपण एकत्र लढू आणि कोरोनाला हरवू असा विश्वासही कंपनीनं व्यक्त केला आहे.
SputnikV ही लस गमालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीद्वारे विकसित करण्यात आली आहे. भारताला कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर येण्यास ही लस मदत करेल असा विश्वास आरडीआयएफचे प्रमुख किरिल दिमित्रिक यांनी व्यक्त केला.
ॲस्ट्राझेनेकाची लसही मिळणारअमेरिकी प्रशासनानेही भारताला मदतीची तयारी दर्शवली असून नजीकच्या काळात ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस जगाला पुरवण्यासाठी अमेरिका सज्ज असेल. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अद्याप ॲस्ट्राझेनेका लसीच्या वापराला मंजुरी दिलेली नाही. ही मंजुरी मिळताच ॲस्ट्राझेनेका लसीचे सहा कोटी डोस जगभरात निर्यात करणार आहे. त्यात भारताचाही समावेश असेल.