ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. २४ : आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहिले. विधानसभा निवडणूकीत भाजपाने काँग्रेसचा धुवा उडवत १२६ जागापैकी ८६ जागावर विजय मिळवत ईशान्येत प्रथमचं आपले सरकार स्थापन केले. यापुर्वी आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सर्वानंद सोनोवाल यांची रविवारी एकमताने निवड झाली. त्यामुळे त्यांचा या राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता.
सोनेवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमास, आसामचे पुर्व मुख्यमंत्री तरुण गोगाई, राजनाथ सिंग, अमित शहा,लालकृष्ण अडवाणी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्बानंद सोनोवाल यांची राजकिय कारकिर्द आणि त्यांचा थोडक्यात परिचय -
सर्बानंद सोनोवाल यांनी गेल्या 15 वर्षापासून राज्यात सत्तारूढ गोगोईंच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला पदच्युत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास कायम राखला आहे. मोदींनीच केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्री तसेच आसामच्या लखिमपूरचे खासदार सोनोवाल यांच्या तरुण खांद्यांवर भाजपासाठी ईशान्येचे द्वार खुले करण्याची जबाबदारी सोपविली होती ती जबाबदारी त्यांनी खंबिर पणे पेलली आहे.
31 ऑक्टोबर 1962 रोजी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात जन्मलेले 54 वर्षीय सोनोवाल यांनी महाविद्यालयीन राजकारण ते केंद्रीय मंत्रिपद असा प्रवास केला आहे. 1992 ते 1999 या कालावधीत ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचे (आसू) अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात या विद्यार्थी संघटनेचा बराच प्रभाव असून आसूने सहा वर्षे आसाम आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी 8 फेब्रुवारी 2011 रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रथम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि नंतर राज्यात भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
पुढे 2012 मध्ये सोनोवाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आणि आजही ते या पदावर कायम आहेत. या वर्षी 28 जानेवारीला पक्षाने त्यांना आसाममध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते. सोनोवाल सर्वप्रथम 2क्क्1 साली मोरन विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. परंतु 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते दिब्रुगडमधून निवडून गेले होते.