लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यामुळे देशातील या आजाराच्या बाधितांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. दिल्लीतील रुग्ण ३४ वर्षे वयाचा असून, त्याने कधीही विदेश प्रवास केलेला नाही. त्याने काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे एका लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या बॅचलर पार्टीला हजेरी लावली होती.
दिल्लीतील या बाधिताला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात विलगीकरणात ठेवले आहे. त्याचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. देशातील मंकीपॉक्सचे पहिले तीन रुग्ण केरळमध्ये सापडले. मंकीपॉक्सची साथ ही जागतिक आणीबाणी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी जाहीर केले.
मंकीपॉक्सबाबत केंद्राने घेतली उच्चस्तरीय बैठकमंकीपॉक्सच्या प्रसारस्थितीचा केंद्र सरकारने रविवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. त्या बैठकीला केंद्रीय आरोग्य खाते, नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (एनसीडीसी), आयसीएमआरचे अधिकारी उपस्थित होते. जगभरातील ७५ देशांमध्ये या आजाराचे १६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.‘सर्व देशांनी सतर्क राहावे’जगभरातील देशांनी मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्याकरिता सतर्क राहावे, तसेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या प्रमुख डाॅ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सचा याआधी मागमूस नव्हता, तिथे या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. ही चिंताजनक स्थिती आहे. विदेशातून आलेल्यांची वैद्यकीय तपासणीविदेशातून भारतातील विविध विमानतळ, बंदरांमध्ये उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राने याआधी राज्यांकरिता मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली होती.