- संजय शर्मानवी दिल्ली - संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात नेमके काय होणार, याची विरोधी पक्षांसह देशवासीयांना उत्सुकता लागली असताना, बुधवारी विषयपत्रिका (अजेंडा) जाहीर करण्यात आली. त्यात १८ सप्टेंबरला पहिल्या दिवशी संविधान सभेपासून आजपर्यंतच्या संसदेच्या ७५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे, तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती विधेयकांसह चार विधेयकेही मांडण्यात येणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने बुधवारी सांगितले.
संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत केंद्र सरकारने १७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सायंकाळी ४.३० वाजता संसद भवनात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षांच्या गटनेत्यांना बोलावले आहे. या बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा सरकारकडून प्रथमच विरोधी पक्षांसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवक्ता दुरुस्ती विधेयक, राज्यसभेने मंजूर केलेले आणि लोकसभेत प्रलंबित असलेले वृत्तपत्रे आणि नियतकालिक नोंदणी विधेयक, टपाल कार्यालय विधेयक सूचीबद्ध केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नोत्तराचा तास आणि अशासकीय कामकाज होणार नाही.
अजेंड्यावर झाली चर्चा- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लोकसभेतील भाजपचे नेते, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल यांच्यात संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा झाली. - पाच दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात एक देश-एक निवडणूक, महिला आरक्षण, भारत विरुद्ध इंडिया, जी-२० चे यश, चंद्रयान-३ चे यश यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या बैठकीत पंतप्रधानांचे अभिनंदन - आगामी मध्य प्रदेश, छत्तीसगड निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पक्ष मुख्यालयात आयोजित करण्यात आली. - यावेळी जी-२० परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज पंतप्रधानांचे भाजप मुख्यालयात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्याची घोषणा केली. - प्रमुख नेत्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली.