लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जनतेने एनडीए सरकारला सलग तिसऱ्यांदा जनादेश दिला आहे आणि आघाडीची धोरणे आणि हेतूंवर मंजुरीचे शिक्कामोर्तब केले आहे. ‘श्रेष्ठ भारत’ आणि ‘विकसित भारत’ उभारण्याच्या संकल्पाने १८ व्या लोकसभेची सुरुवात सोमवारपासून होत आहे. लोकांना घोषणा नको, ठोस कृती हवी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे ठामपणे सांगितले.
लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला संसदेच्या संकुलात प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन सहमतीने काम करेल. २५ जून रोजी आणीबाणीचा ५० वा वर्धापनदिन आहे. संविधान नाकारणारा हा दिवस भारताच्या लोकशाहीवरील ‘काळा डाग’ आहे. भारतात कोणीही असे धाडस पुन्हा करणार नाही, असा संकल्प घ्या, असे आवाहनही मोदी यांनी केले.
२०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचे स्वप्न घेऊन १८ वी लोकसभा सुरू होत आहे. जनतेला विरोधकांकडून चांगल्या पावलांची अपेक्षा आहे. मात्र, आतापर्यंत निराशा झाली आहे. ते आपली भूमिका पार पाडतील आणि लोकशाहीची प्रतिष्ठा कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाला जबाबदार विरोधी पक्ष हवा पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशातील जनतेला विरोधकांकडून ‘तक्रारबाजी, नाटक, घोषणाबाजी आणि व्यत्यय’ याऐवजी ठोस काम आणि संसदेची प्रतिष्ठा राखण्याची अपेक्षा आहे. कुणाची कोणत्या भाषेत शपथ ? - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि अमित शाह : हिंदी- पोलाद आणि अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी : कन्नड- शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान : ओडिया- बंदरे आणि जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल : आसामी - नागरी विमान वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू, कोळसा आणि खाणमंत्री जी. किशन रेड्डी : तेलुगू- ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी : कन्नड
महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली मराठीतून शपथमहाराष्ट्रातून निवडून आलेले सदस्य प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांनी मराठी भाषेत शपथ घेतली. श्रीपाद नाईक यांनी कोकणी भाषेमध्ये शपथ घेतली. तत्पूर्वी महताब यांनी राष्ट्रपती भवनात नवीन लोकसभेचे सदस्य म्हणून तसेच हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तर मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी हिंदीतून शपथ घेतली.
राहुल गांधी, अखिलेश अन् अयोध्येचे खासदारशपथ घेतल्यानंतर पंतप्रधान हंगामी अध्यक्ष महताब यांच्याशी हस्तांदोलन करतात. त्यानंतर ते संसदेच्या उर्वरित सदस्यांकडे वळतात. याच क्रमाने मोदी डाव्या बाजूला वळताच राज्यघटनेची प्रत घेतलेले, पांढरा शर्ट परिधान केलेले राहुल गांधी आणि लाल टोपी घातलेले अखिलेश यादव पंतप्रधानांना हात जोडून अभिवादन करतात. हे नवे चित्र लोकसभेत दिसले. हे दोन्ही तरुण नेते लोकसभेत शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्या शेजारीच अयोध्याचे खासदार अवधेश प्रसाद होते. अखिलेश त्यांना सोबत घेऊनच सर्वत्र जात आहेत. त्यांना अधिक संधी देऊन अखिलेश भाजपला वेगळा संदेश देऊ पाहत आहेत.
भाकप खासदार घसरून पडलेभारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (एमएल) खासदार राजाराम सिंह सोमवारी लोकसभेत शपथ घेण्यासाठी उठल्यानंतर अचानक घसरले आणि पडले. मात्र ते लगेच सावरले. सभागृहात त्यांचे नाव पुकारण्यात आल्यानंतर शपथ घेण्यासाठी व्यासपीठाकडे जात असताना हा प्रकार घडला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्यांच्या मदतीला धावताना दिसले.
पंतप्रधानांना दाखविली राज्यघटनेची प्रतपंतप्रधान मोदी शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर चढत असताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांना राज्यघटनेची प्रत दाखवायला सुरुवात केली. काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर संसदेतील याचा व्हिडीओही शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल झाला.