नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी वरिष्ठ सभागृहाच्या अनेक सदस्यांसह कोविड चाचणी करून घेतली. अँटिजेन चाचण्यांत कोणीही सकारात्मक आढळले नाही. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मीडियाशी संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आर्थिक सर्व्हे सादर केल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे, आता सोमवारी सकाळी 11 वाजताच सभागृहात चर्चेला सुरुवात होईल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वी लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर केला. यानंतर हा आर्थिक सर्व्हे संसदेच्या वरीष्ठ सभागृहातही सादर होईल. मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यावर दुपारी ३.३० वाजता एका पत्रकार परिषदेत याची माहिती देतील. मात्र, लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर करण्यात आल्यानंतर आज संपूर्ण दिवसासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलंय. त्यानंतर, उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे आता थेट 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आलीय, असंच म्हणता येईल. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन हेही कोविड नियमावलीच्या निर्बंधांतच होत आहे. कोविड महामारीचा जोर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कमी होत होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशन झाले नाही.आता, लोकसभा आणि राज्यसभेतील अधिकारीव व कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या करुन घेण्यात आल्या आहेत. आता, 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रपतींचं सर्वसमावेशक भाषण
राष्ट्रपती रामनाद कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात देशातील विविध मुद्द्यावर चर्चा केली. तसेच, देशासाठी आणि जनतेसाठी सरकार कटिबद्ध असून जनहिताचे निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे दिल्लीतील आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा ओझरता उल्लेख करत, शेती विधेयक हे देशातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आणल्याचंही ते म्हणाले. तूर्तास, कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. माझं सरकार न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतं. ते न्यायालयाच्या आदेशांचं पालन करेल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. यावेळी, राष्ट्रपतींनी गेल्या वर्षातील सरकारचे महत्वपूर्ण निर्णय आणि लॉकडाऊन काळातील परिस्थितीतील कार्याचाही उल्लेख केला.
मोदींचं आवाहन
'आज या दशकातील पहिल्या वहिल्या अधिवेशनाला सुरुवात होतेय. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याची एक सुवर्णसंधी देशासमोर आली आहे. या दशकाचा संपूर्ण वापर व्हायला हवा. हे ध्यानात ठेवूनच या अधिवेशनात पुढच्या दशकभराकडे लक्ष देणारी चर्चा व्हायला हवी, असे मोदींनी मीडियाशी बोलताना म्हटले. तसेच, मला विश्वास आहे की नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आपलं योगदान देण्यात मागे राहणार नाही' असंही पंतप्रधान म्हणाले.
संसद सदस्यांचीही होणार चाचणी
संसद सदस्यांना अशाच चाचण्यांतून जावे लागेल आणि येथे तीन दिवस त्या होतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ३३ बैठका शुक्रवारपासून सुरू होतील. २०२१-२०२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प कोविड महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्यांदाच सादर होत आहे.