सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत यावर लसीकरण हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. दरम्यान, १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणालाही सुरूवात झाली. अशातच मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राची सुरूवात करण्यात आली. भोपाळ श्यामला हिल्स परिसरात उभारण्यात आलेल्या मध्यप्रदेश टुरिझ्मच्या ड्राईव्ह इन सिनेमा येथे या लसीकरण केंद्राची सुरूवात करण्यात आली. शनिवारी याचं उद्घाटन करण्यात आलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग आणि जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रावर शनिवारी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हे लसीकरण केंद्र सुरक्षित आणि अनोखा प्रयोग आहे. याप्रकारचे नवे प्रयोग अन्य ठिकाणीही केले जातील, असं सारंग म्हणाले. या नव्या योजनेअंतर्गत पहिल्या दिवशी ९५ जणांचं लसीकरण करण्यात आली. लसीकरण झाल्यानंतर संबंधितांना अर्ध्या तासाकरिता याच परिसरात थांबावं लागेल. यादरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या पडद्यावर माहिती दिली जाईल. या ठिकाणी रोज संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना या ठिकाणी लस दिली जाईल. यासाठी पूर्ण नोंदणी केली असणं आवश्यक आहे. पिकअप ड्रॉप सेवा उपलब्ध"या लसीकरण केंद्रांसाठी पिकअप आणि ड्रॉपची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे १० किलोमीटरसाठी ४०० रूपये, २० किलोमीटरसाठी ६०० रूपये आणि ३५ किलोमीटरसाठी ९०० रूपये शुल्क द्यावं लागेल. ही सेवा घेणाऱ्या नागरिकांना एमपी टुरिझ्मद्वारे त्यांच्या घरातून घेऊन लस घेतल्यानंतर पुन्हा घरापर्यंत सोडलं जाईल," अशी माहिती एमपी टुरिझ्मचे व्यवस्थापकीय संचालक एस. विश्वनाथन यांनी दिली.
Coronavirus : भोपाळमध्ये MP मधील पहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू; पिकअप, ड्रॉप सेवाही उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:03 PM
Coronavirus Vaccine : पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राला झाली सुरूवात. शनिवारी करण्यात आलं उद्घाटन.
ठळक मुद्देपहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राला झाली सुरूवात.शनिवारी करण्यात आलं उद्घाटन.