नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज भारतात तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेतून (America) भारतात विमान दाखल झाले असून यामध्ये कोरोनासोबत लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. (first emergency covid relief supplies arrive from america)
वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या हवाई दलाचे सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य आणि १० लाख रॅपिट कोरोना टेस्ट किट पाठवण्यात आले आहे. याचबरोबर, भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट केले आहे. यामध्ये विमानाचा फोटो शेअर केले आहेत. तसेच, म्हटले आहे की, "अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. ७० वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून करोना संकटाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे".
नरेंद्र मोदी-जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद!लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी अमेरिकेने हटविण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गेल्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची फोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली होती. यावेळी "आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसेच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले," अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली होती. तर "लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचे जागतिक आव्हान सोडवू शकते," असेही ते म्हणाले होते.
(CoronaVirus: आता आमची वेळ! अमेरिकेला तेव्हाची मदत आठवली; लसीचा कच्चा माल देण्यास तयार)