नवी दिल्ली : दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस देशात लष्कर दिन अर्थात ‘आर्मी डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीत भव्य परेड आयोजित केली जाते. परंतु इतिहासात यंदा प्रथमच भारतीय लष्कराचा हा सर्वात प्रतिष्ठित सोहळा (आर्मी डे परेड) बंगळुरूमध्ये आयोजित केला जाईल. ही परेड मद्रास अभियांत्रिकी गटाच्या (एमईजी) रेजिमेंटल सेंटरमध्ये होणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे दक्षिणेकडील राज्यांतील लोकांचे शौर्य, बलिदान आणि सेवा यांना वंदन आहे. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनाही ही आदरांजली आहे. भारतीय लष्कराचे जवान क्रीडा सुविधा तयार करतील आणि युवक व विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण सामने आयोजित करतील. सदर्न कमांडमध्ये हरित भारतासाठी पर्यावरण संरक्षण या संकल्पनेवर ७५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. वाद्यवादन, बँड परफॉर्मन्स, प्रश्नमंजूषा स्पर्धा, चित्रकला, निबंध लेखन, सायक्लोथॉन व प्रेरक भाषण यासह इतर कार्यक्रम होणार आहेत.
लष्करप्रमुख घेणार आढावा
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे १५ जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये आर्मी डे परेडचा आढावा घेतील आणि लष्कराच्या पराक्रमावर प्रकाश टाकणाऱ्या परेडचाही आढावा घेतील.