पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाने देशात प्रथमच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्यांसाठी मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन ही सुविधा तयार केली आहे. त्यामुळे नाकाबंदीवर राहणार्या पोलिसांना दिलासा मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गातून बचावासाठी निजंर्तुकीकरणासाठी अनेक ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ पट्टा तयार केला जात आहे. रस्त्यावर असणार्या पोलिसांसाठी अशी काही सॅनिटाझेशनची सोय करता येईल का या विचारातून अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून हे ''सॅनिटायझेशन पोलीस व्हॅन '' तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. ही सुविधा ही बसवण्यासाठी पुणे पोलीस मोटर परिवहन विभागामधील वाहनाचा उपयोग करण्यात आला आहे. या गाडीमध्ये ''स्प्रेशर फॉगिंग सिस्टीम'' वापरण्यात आली आहे.
या गाडीमध्ये कर्मचारी ६ ते ७ सेकंदांसाठी उभे राहिल्यास निजंर्तुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. नाकाबंदीच्या ठिकाणी हे वाहन जाईल व त्याठिकाणी पोलीस आपल्याला निजंर्तुक करुन घेतील अशा प्रकारे हे वाहन सर्व शहरभर फिरणार आहे. सोमवारी सकाळी या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यातून रस्त्यावर नाकाबंदी करणार्या पोलिसांना सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे.
भारतात पुणे पोलिसांनी प्रथमच सॅनिटायझेशन वाहनाचा असा प्रयोग केला असून दिवसभर राबणार्या पोलीस कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविला आला आहे. ही सुविधा दीपक रोंधे, रोंधे एंटरप्रायजेस यांच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या आणखी ३ ते ४ पोलीस व्हॅन तयार करण्यात येणार आहेत.